OpenAI

२५ एप्रिल, २०२६

ग्लोबल अफेयर्स

एआयमुळे रोजगारात होणाऱ्या बदलांचे प्रारूप

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोजगार यांवरील बहुतेक चर्चा एका साध्या प्रश्नाने सुरू होतात: एआय कोणती कामे करू शकते?

हा प्रश्न महत्त्वाचा आहे, पण कामगारांवर काय परिणाम होतील हे वर्तवण्यासाठी तो पुरेसा नाही. एखाद्या व्यवसायातील अनेक कामे तंत्रज्ञान करू शकत असले, तरी त्यामुळे तो व्यवसायच नष्ट होईल असे नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. काही भूमिकांत माणसे आवश्यक राहू शकतात, कारण ग्राहकांना मानवी संवाद हवा असतो, संस्थांना मानवी उत्तरदायित्व आवश्यक असते किंवा कामासाठी प्रत्यक्ष उपस्थिती आणि विवेकबुद्धी लागते. किंवा खर्च घटल्याने मागणी इतकी वाढू शकते की एआयमुळे कामगारांची उत्पादकता वाढत असतानाही उद्योगातील रोजगार कमी होण्याऐवजी वाढू शकतो.

OpenAI ची एआयमुळे होणाऱ्या रोजगार संक्रमणाची चौकट या शक्यतांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते. तंत्रज्ञानाने कामे करता येणे म्हणजे नोकऱ्या जाण्याचा अंदाज असे न मानता, ही चौकट तीन प्रश्न विचारते:

  • एखाद्या व्यवसायातील लक्षणीय प्रमाणात कामे एआय करू शकते का?

  • काम करणे, त्यावर देखरेख ठेवणे किंवा त्याची जबाबदारी घेणे यांत व्यक्तीची भूमिका अजूनही केंद्रस्थानी आहे का?

  • एआयमुळे सेवेचा खर्च कमी झाला, तर वाढलेल्या उत्पादकतेला सामावून घेण्याइतकी मागणी वाढेल का?

अमेरिकेतील सुमारे 14.8 कोटी नोकऱ्यांचा समावेश असलेल्या 921 व्यवसायांना ही चौकट लागू केल्यावर श्रमबाजारातील संक्रमणाचे अधिक वैविध्यपूर्ण चित्र दिसते. सुमारे 18 टक्के नोकऱ्यांना स्वयंचलनाचा तुलनेने अधिक धोका आहे, 24 टक्क्यांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे, 12 टक्के एआयमुळे वाढू शकतात, तर 46 टक्क्यांत तातडीने कमी बदल दिसतात.

ठरावीक टक्के नोकऱ्या नष्ट होतील, असे भाकीत या श्रेणी करत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे बदल प्रथम कुठे दिसू शकतात, याची दिशा त्या दाखवतात.

कामाच्या स्वरूपातील बदलांच्या चार वेगळ्या दिशा

स्वयंचलनाचा अधिक धोका असलेल्या नोकऱ्या: यात माहिती नोंदणी लिपिक, दूरध्वनीवरून विपणन करणारे, मुद्रितशोधक आणि काही लेखापालन किंवा प्रशासकीय पदांचा समावेश असू शकतो. यातील बरेच काम ठरावीक स्वरूपातील माहितीवर प्रक्रिया करणे, ती तपासणे किंवा पोहोचवणे असे असते. अंतिम सेवा व्यक्तीने थेट न देताही अशी कामे करण्याची एआयची क्षमता वाढत आहे. यातून वाढलेल्या उत्पादकतेमुळे घटणारी मनुष्यबळाची गरज भरून काढण्याइतकी या कामांची मागणी वाढेलच असे नाही.

या नोकऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, विशेषतः रोजगार ठरावीक भागात एकवटलेला असेल किंवा कामगारांना संबंधित भूमिकांकडे वळण्याचे मर्यादित पर्याय असतील तेव्हा. मात्र इथेही, तांत्रिक क्षमता असल्याने नोकऱ्या आपोआप किंवा लगेच जातील असे नाही. नियोक्त्यांना कार्यप्रवाहांची पुनर्रचना, विद्यमान प्रणालींत एआयचे एकत्रीकरण, चुका व नियामक जोखमींचे व्यवस्थापन करावे लागेल. लोकांना नोकरीवर ठेवण्यापेक्षा स्वयंचलन खरोखर स्वस्त पडते का, हेही ठरवावे लागेल.

पुनर्रचना होणाऱ्या नोकऱ्या: दुसऱ्या आणि अधिक मोठ्या गटातील नोकऱ्या नष्ट होण्याऐवजी त्यांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. वकील, लेखापाल, संगणक प्रणाली विकसक, आर्थिक विश्लेषक आणि शिक्षक ही संभाव्य उदाहरणे आहेत. एआय आताच करारांचे मसुदे, पुराव्यांचा सारांश, आर्थिक विश्लेषण, संगणकीय सूचना आणि अध्यापन साहित्य तयार करू शकते. पण विवेकाने निर्णय घेणे, त्यांची जबाबदारी स्वीकारणे, अपवादात्मक प्रकरणे समजून घेणे आणि सहकारी, विद्यार्थी किंवा ग्राहकांशी नाती जोडणे यासाठी ग्राहकांना व संस्थांना अजूनही माणसे लागतात.

एआयमुळे प्रत्येक वकिलाला अधिक कागदपत्रे तपासता येतील, प्रत्येक विकसकाला अधिक संगणकीय सूचना लिहिता येतील किंवा प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिक गरजांनुसार अधिक साहित्य तयार करता येईल. यामुळे काही कामांसाठी लागणारे श्रम कमी होऊ शकतात, पण या व्यवसायांचे मानवी स्वरूप ठळकपणे कायम राहील. मुख्य प्रश्न नोकऱ्यांची पुनर्रचना कशी होते हा असेल: कोणती कामे एआयकडे जातात, कोणती कामगारांकडे राहतात आणि सुरुवातीची पदे व कारकिर्दीतील वाटचाल शिकण्याच्या संधी देत राहतात का?

“सर्व 900 हून अधिक व्यवसाय (15.2 कोटी नोकऱ्या)” या शीर्षकाचा प्रवाह आलेख. यात एआयच्या प्रभावानुसार नोकऱ्यांचे चार गट दाखवले आहेत: 46% नोकऱ्यांत तातडीने कमी बदल, 12% एआयमुळे वाढणाऱ्या, 24% पुनर्रचना होणाऱ्या आणि 18% स्वयंचलनाचा अधिक धोका असलेल्या.

एआयमुळे वाढणाऱ्या नोकऱ्या: या क्षेत्रांत एआयमुळे खर्च इतका कमी होऊ शकतो की मागणी वाढेल.  यात शिकवणी शिक्षक, मानसिक आरोग्य समुपदेशक, वैयक्तिक आर्थिक सल्लागार आणि काही आरोग्यसेवा व्यावसायिक येतात. सध्या अनेकांना या सेवा महाग पडतात किंवा सहज उपलब्ध होत नाहीत. या क्षेत्रांत उत्पादकता वाढणे म्हणजे कामगारांची संख्या कमी होणे असे आवश्यक नाही. शिकवणी अधिक परवडणारी झाल्यास अधिक कुटुंबे ती घेऊ शकतील. आर्थिक सल्ला स्वस्त झाल्यास, सध्या सल्लागार परवडत नसलेल्या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन मिळू शकेल. एआयची मदत घेणारे चिकित्सक रुग्णांच्या प्रकृतीचा अधिक पाठपुरावा करून सातत्यपूर्ण उपचार देऊ शकतील. मागणी पुरेशी वाढल्यास, प्रत्येक कामगार अधिक उत्पादक होत असतानाही एकूण रोजगार वाढू शकेल.

तातडीने कमी बदल होणाऱ्या नोकऱ्या: यात मुख्य कामे शारीरिक श्रमाची आणि विशिष्ट ठिकाणीच करावी लागणारी अनेक पदे येतात. उदाहरणार्थ, वीजतंत्री, नळकामगार, छप्परकामगार, बांधकाम मजूर आणि अन्नसेवेतील अनेक कामगार. वेळापत्रक, खर्चाचे अंदाज, प्रशिक्षण, साठा किंवा ग्राहकांशी संवाद यांत एआय मदत करू शकते. पण सध्या ती विजेच्या तारा बसवणे, नळ दुरुस्त करणे, छप्पर बदलणे किंवा जेवण बनवून वाढणे करू शकत नाही.

हे व्यवसाय एआयच्या प्रभावापासून पूर्णपणे दूर राहणार नाहीत. त्यांची प्रशासकीय व व्यवस्थापकीय कामे बदलू शकतात आणि यंत्रमानव तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे पुढे स्वयंचलनाची व्याप्ती वाढू शकते. पण सध्या त्यांच्या मुख्य कामांत भाषाधारित एआयचा वाव तुलनेने कमी असल्याने नजीकच्या काळात मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे.

प्रारंभिक पुराव्यांतून रोजगार घटण्याचा सरळसोट कल दिसत नाही

संपूर्ण व्यवसाय नाहीसे होण्याआधी एआयचे प्रारंभिक परिणाम कामे, कार्यप्रवाह आणि आवश्यक कौशल्ये यांतील बदलांतून दिसण्याची शक्यता आहे. खरे तर, स्वयंचलनाचा अधिक धोका असल्याचे ओळखलेल्या व्यवसायांत एआयचा प्रत्यक्ष वापर आताच अधिक आहे. सर्वाधिक धोका असलेल्या व्यवसायांत ChatGPT चा वापर एकूण कामगारवर्गाच्या तुलनेत सुमारे तिप्पट आहे.

तरीही बेरोजगारीतील अलीकडील बदलांचा कामे तंत्रज्ञानाद्वारे करता येण्याशी थेट मेळ बसत नाही. 2024 च्या पहिल्या तिमाहीपासून, या चौकटीनुसार एआयचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यवसायांपेक्षा एआयचा कमी वाव असलेल्या काही व्यवसायांत बेरोजगारी अधिक वाढली आहे. मात्र यावरून एआयचा श्रमबाजारावर काहीच परिणाम होत नाही, असे सिद्ध होत नाही. व्यवसायांतील बेरोजगारीवर अनेक घटकांचा प्रभाव असतो. काही बदल आधी नोकरकपातीऐवजी भरती, सुरुवातीच्या संधी, वेतन किंवा कामाच्या रचनेत दिसू शकतात.

धोरणांसाठी अधिक उपयुक्त दिशादर्शन

एआयमुळे कामाचे भविष्य एकाच अपरिहार्य दिशेने जाईल असे नाही. तांत्रिक क्षमता महत्त्वाची आहेच; पण संस्था, ग्राहकांची मागणी, व्यावसायिक निर्णय, नियमन आणि मानवी सहभागाचे टिकून राहणारे मोल हेही महत्त्वाचे आहे. या शोधनिबंधात मांडलेली संक्रमणाची चौकट सुचवते की वेगवेगळ्या व्यवसायांसाठी वेगवेगळे धोरणात्मक उपाय लागतील. 

  • स्वयंचलनाचा अधिक धोका असलेल्या नोकऱ्यांसाठी पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा, बदलांशी जुळवून घेण्यासाठी लक्ष्यित मदत आणि स्थानिक गरजांनुसार संक्रमण योजना आवश्यक ठरू शकतात. 

  • पुनर्रचना होण्याची शक्यता असलेल्या नोकऱ्यांसाठी अद्ययावत प्रशिक्षण, व्यावसायिक मानके, कर्मचारी नियुक्तीचे नियम आणि मानवी देखरेखीबाबत अधिक स्पष्ट अपेक्षा आवश्यक असू शकतात. 

  • वाढीची क्षमता असलेल्या नोकऱ्यांना एआयच्या स्वीकाराला प्रोत्साहन देणारी, सेवांची उपलब्धता वाढवणारी आणि या क्षेत्रात येण्यासाठी अधिक कामगारांना तयार करणारी धोरणे लाभदायक ठरू शकतात.

सर्व श्रेणींसाठी धोरणकर्त्यांना अधिक चांगली, वेळच्या वेळी मिळणारी माहिती हवी आहे. पारंपरिक श्रमविषयक आकडेवारी मोलाची आहे. पण कामे, नियोक्त्यांच्या अपेक्षा आणि तंत्रज्ञानाचा वापर यांतील बदल टिपण्याइतक्या वेगाने ती अनेकदा अद्ययावत होत नाही. रोजगाराची आकडेवारी, एआयच्या क्षमतेचे मोजमाप आणि प्रत्यक्ष स्वीकाराचे प्रमाण एकत्र पाहिल्यास कुठे दबाव वाढतो आहे याचे चित्र अधिक वेळेवर मिळू शकते.

उद्धरण

उद्धरण

1
@techreport{openaiecon2026jobstransition,
2
author = {Alex Martin Richmond},
3
title = {The {AI} Jobs Transition Framework: Mapping {AI}'s Near-Term Impact on Jobs},
4
date = {2026-04},
5
year = {2026},
6
institution = {OpenAI Economic Research},
7
type = {Report},
8
url = {https://cdn.openai.com/pdf/the-ai-jobs-transition-framework_report.pdf},
9
}