OpenAI अधिक सुरक्षित करण्यासाठी आमच्या पुढील सुरक्षा मोहिमेची तयारी
OpenAI मध्ये आम्ही पुढील अल्पकालीन अंतर्गत सुरक्षा मोहिमेची आखणी करत आहोत. आमच्या प्रणालींची चाचणी घेण्यासाठी आणि त्या अधिक सुरक्षित करण्यासाठी आमच्या मॉडेलचा वापर करताना नवे संशोधक आणि सुरक्षा भागीदार आमच्या संघांसोबत काम करतील. आम्ही Cathedral सोबत भागीदारी करत आहोत. त्यांचे संशोधक आमच्या संघांसोबत OpenAI ची मॉडेल वापरून आमच्या सुरक्षा उपायांची कसोटी पाहतील. त्यांच्या विशेष कौशल्याचा आणि वेगळ्या पद्धतींचा उपयोग करून ते त्रुटी शोधतील आणि आमच्या मंचांचे संरक्षण करण्यास मदत करतील.
आम्ही आमच्या सुरक्षा त्रुटी शोधण्यासाठीच्या बक्षीस योजनेतही सुधारणा करत आहोत. यात अतिगंभीर त्रुटी शोधल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या बक्षिसांची रक्कम चौपटीहून अधिक वाढवण्याचाही समावेश आहे. संशोधकांनी आमच्या गृहीतकांची कसोटी पाहावी आणिआमच्या प्रणाली तसेच त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही वापरत असलेल्या पद्धती अधिक भक्कम करण्यास मदत करावी, अशी आमची इच्छा आहे.
आमच्या प्रणालींमधील त्रुटी सातत्याने शोधण्यासाठी आणि दूर करण्यासाठी AI वापरण्याच्या आमच्या निरंतर प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या दृष्टिकोनातून काय साध्य होऊ शकते, हे आमच्या मागील मोहिमेत दिसून आले. आम्ही आमच्या उत्पादन अभियंत्यांपैकी 25% अभियंत्यांना आमच्या प्रणालींमधील त्रुटी शोधण्याचे आणि दूर करण्याचे काम दिले होते. Codex वापरून अभियंत्यांनी आढळलेल्या त्रुटींचा तपास केला, विलग चाचणी वातावरणात सुरक्षा त्रुटी पुन्हा निर्माण केल्या आणि पुनरावलोकनासाठी दुरुस्त्या तयार केल्या.
आम्ही ते काम पुढे नेत आहोत, कारण आता केवळ पारंपरिक सायबर सुरक्षा उपाय पुरेसे नाहीत. उद्योगक्षेत्रातील अलीकडच्या घटनांवरून धोके किती झपाट्याने उद्भवू शकतात हे दिसते. तसेच हल्लेखोरांना त्रुटी सापडण्याआधीच त्या शोधून दूर करण्यासाठी सातत्याने चालणाऱ्या सुरक्षा प्रक्रिया उभारणे किती महत्त्वाचे आहे, हेही स्पष्ट होते.
बचावासाठी मिळालेली संधी कायम राखण्यासाठी संस्थांनी अत्याधुनिक सायबर क्षमता वापरून आपल्या प्रणाली अधिक सुरक्षित करणे आवश्यक आहे. आम्ही आमची सर्वाधिक सक्षम मॉडेल वापरून स्वतःची सुरक्षा अधिक भक्कम करत आहोत आणि ती Daybreak च्या ग्राहकांनाही उपलब्ध करून देत आहोत. अत्यावश्यक सेवा आणि डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षण करणाऱ्या आघाडीवरील सुरक्षा तज्ज्ञांना सहा महिन्यांत सवलतीच्या दरात वापराची सुविधा देण्यासाठी आम्ही 1 अब्ज अमेरिकी डॉलरची तरतूद करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. आम्ही मागील मोहिमेतील आमची प्रणालीरचना आणि शिकवण तसेच उद्योगक्षेत्रातील व सरकारी सायबर सुरक्षा तज्ज्ञांना सक्षम करण्यासाठीचा आमचा आराखडाही शेअर करत आहोत.
आम्ही आमची मॉडेल आणखी प्रगत करत राहू, त्यांचा वापर करून स्वतःच्या प्रणाली अधिक सुरक्षित करू आणि अधिकाधिक विश्वासार्ह सुरक्षा तज्ज्ञांना ती उपलब्ध करून देऊ. बचावासाठी मिळालेली संधी कायम राखायची असेल, तर संपूर्ण उद्योगक्षेत्राने कृती करणे गरजेचे आहे आणि त्या कामाला आत्ताच सुरुवात व्हायला हवी.


